in

मराठी वेबसाईट्स साठी स्पर्धा.

Competition for Marathi websites
Competition for Marathi Websites Announced

नमस्कार, नुकतेच वाचनात आले कि  राज्य मराठी विकास संस्थेने सीडॅक मुंबई (बॉस) आणि माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन ह्यांच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळांची (वेबसाईट्सची) खुली स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेची माहिती शक्य तितक्या सर्व लोकांपर्यंत पोहचवावी या उद्देशाने खालिल माहिती आपणास इथे पुरवत आहे. जर आपण एका मराठी वेबसाईट म्हणजेच मराठी संकेतस्थळाचे मालक असाल तर या स्पर्धेत जरुर सामील व्हा.

अलीकडे संगणकावर मराठीतून माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे. अशा वेळी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ह्या वर्षी राज्य मराठी विकास संस्थेने सीडॅक मुंबई (बॉस) आणि माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन ह्यांच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळांची (वेबसाईट्सची) खुली स्पर्धा आयोजित केली आहे.

ही स्पर्धा १. शासकीय संकेतस्थळे आणि २. अशासकीय संकेतस्थळे अशा दोन गटांत घेण्यात येईल. पहिल्या शासकीय संकेतस्थळे ह्या गटासाठी पहिले, दुसरे आणि तिसरे असे अनुक्रमे १५०००, १०००० आणि ५००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. तर दुसऱ्या अशासकीय संकेतस्थळे ह्या गटासाठी पहिले, दुसरे आणि तिसरे असे अनुक्रमे ३५०००, २०००० आणि १५००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील.
दि. २०/०२/२०१०पासून दि. ०६/०३/२०१० पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या दुवा क्र. १ ह्या अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्य पानावर ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवेशपत्रिकेचा दुवा (लिंक) राज्य मराठी विकास संस्थेच्या दुवा क्र. २ तसेच दुवा क्र. ३ आणि दुवा क्र. ४ ह्या संकेतस्थळांवरही देण्यात येईल. वरील कालावधीत स्पर्धकांनी ऑनलाइन प्रवेशपत्रिका संपूर्णपणे भरून स्पर्धेतील सहभाग नोंदवायचा आहे. प्रवेशपत्रिका स्वीकारण्याची अंतिम मुदत ०६/०३/२०१० ही आहे. वरील गटांपैकी प्रत्येक गटाला पहिले, दुसरे आणि तिसरे अशी तीन पारितोषिके देण्यात येतील.
संकेतस्थळासाठी वापरलेली प्रमाणके (स्टॅन्डर्ड्‌स), वापरलेला टंक (फॉण्ट), संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, उपयुक्तता, अद्ययावत्‌पणा, वापरकर्त्यांच्या सहभागाची सोय (इण्टरऍक्टिव्हनेस), माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह इत्यादी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.
शासनाचे विविध विभाग तसेच विविध विषयांवर संकेतस्थळे निर्माण करणाऱ्या व्यक्ती, संस्था इत्यादींनी ह्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेने केले आहे.

या अवाहनाला आपण भरभरुन प्रतिसाद द्याल हिच अपेक्षा बाळगतो.
आशिष कुलकर्णी
स्त्रोतः मनोगत्.कॉम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Pune has the biggest Porn Market

लिझ्झी…